१.९७ लाखांचा थेट अपहार आणि साहित्य गायब; कोकण विभागीय आयुक्तांनी कलम ३९(१) अन्वये केली बडतर्फीची कारवाई
देवरूख, रत्नागिरी: पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत झालेला आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता चौकशीत सिद्ध झाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशीचे सरपंच सचिन शांताराम चव्हाण यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९(१) अन्वये २५ ऑगस्ट रोजी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
कळंबुशी ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत सरपंचांनी पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत उघड झालेले गंभीर गैरव्यवहार:
- कामाशिवाय बिल उचलले: ‘शेवट करंडा’ पाखाडीचे कोणतेही प्रत्यक्ष काम न करताच ८५,००४ रुपयांची रक्कम लाटण्यात आली.
- बनावट देयके व संशयित अपहार: पुरावे आणि योग्य मूल्यांकनाशिवाय विविध बिले अदा करून १,१६,६८१ रुपयांचा संशयित अपहार करण्यात आला. अशा प्रकारे एकूण १,९७,४५४ रुपयांचा थेट अपहार उघडकीस आला.
- ग्रामपंचायतीचे साहित्य गायब: साठा नोंदवहीत (Stock Register) कोणतीही नोंद न करता ६०० पैकी तब्बल १२८ कचराकुंड्या आणि ५८ पैकी ३८ खुर्च्या गायब असल्याचे तपासणीत समोर आले.
शासकीय निधीचा अपहार आणि साहित्याची हेराफेरी सिद्ध झाल्याने विभागीय आयुक्तांनी ही बडतर्फीची कारवाई केली असून, या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील राजकीय व ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 03-09-2026














