Unauthorized Encroachment Removal Lanja: अनधिकृत टपऱ्या व खोक्यांवर लांजा नगरपंचायतीचा हातोडा; छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील कारवाई

वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; नोटीस देऊनही न हटवलेले ९ खोके अखेर निष्कासित

लांजा, रत्नागिरी: लांजा शहर व परिसरात रस्ता व्यापणाऱ्या अनधिकृत टपऱ्या आणि खोक्यांविरोधात नगरपंचायतीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत लांजा-साटवली मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनधिकृत खोके सोमवारी हटवण्यात आले.

लांजा-साटवली मार्गावर रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे व हातगाड्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे वारंवार वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात नगरपंचायतीकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच याच मार्गावरील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनीही तीव्र आक्षेप नोंदवला होता. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने अखेर प्रशासनाकडून ही धडक कारवाई हाती घेण्यात आली.

नोटीस देऊन मुदत संपल्यानंतर कारवाई या रस्त्यालगत यापूर्वी १३ अनधिकृत खोके होते. त्यापैकी वापरात नसलेले ४ खोके महिनाभरापूर्वीच हटवण्यात आले होते. उर्वरित ९ खोकेधारकांना जुलै महिन्यात नगरपंचायतीने नोटीस बजावली होती. मात्र तरीही अतिक्रमणे कायम राहिल्याने २५ ऑगस्ट रोजी पुन्हा अंतिम नोटीस देऊन ४८ तासांत खोके हटवण्याचे निर्देश दिले होते. मुदत संपल्यानंतर सोमवारी नगरपंचायतीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान ६ खोकेधारकांनी स्वतःहून खोके काढून घेतले, तर उर्वरित ३ खोके नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी हटवले.

या मोहीमेत लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रभारी नगर अभियंता रणवीर कोकरे-देसाई, नगररचना सहाय्यक सुचेत बन्ने, लिपिक संजय गुरव, संतोष आगरे यांच्यासह नगरपंचायतीचे इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 03-09-2026