हत्यारबंद आरोपींचा प्रतिकार मोडून काढत दोघांना बेड्या; तिसऱ्या फरार आरोपीसाठी जंगलात कॉम्बिंग ऑपरेशन
रत्नागिरी: तालुक्यातील वेतोशी हद्दीत करबुडे हायवेनजीक फणसाळे मधली वाडी (खुरीचा आंबा) येथे सुरू असलेला गोवंश हत्येचा अवैध प्रकार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. जीवाची पर्वा न करता पोलिसांनी सापळा रचून हत्यारबंद आरोपींपैकी दोघांना बेड्या ठोकल्या असून, अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी जंगलात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असताना ग्रामीण पोलीस निरीक्षक पालवे यांच्या पथकाला या अवैध प्रकाराची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच पालवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली. करबुडे हायवेनजीक मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर गोवंश हत्येचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांवर हत्यार उगारले; पोलिसांकडून एकाला जागीच बेड्या पोलिसांनी अत्यंत जलद गतीने अंधारातच सापळा रचला. या कारवाई दरम्यान आरोपींकडे तीक्ष्ण हत्यारे होती आणि एका आरोपीने पोलिसांवर हत्यारही उगारले. मात्र, जिवाची पर्वा न करता पोलिसांनी अत्यंत धैर्याने एका आरोपीला घटनास्थळावरूनच बेड्या ठोकल्या. अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीला गुरुवारी सकाळी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले, तर तिसऱ्या फरार आरोपीचा जंगलात शोध सुरू आहे.
मोठ्या प्रमाणावर मांस जप्त; ग्रामस्थांचे सहकार्य घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोवंश मांस जप्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या धडक कारवाईत स्थानिक ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य लाभले.
सकाळी घटनास्थळी सरपंच निलेश लोंढे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पवार, पोलीस पाटील विष्णू ठीक तसेच ऋतुजा आंबेकर आदी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 03-09-2026














