Rotary Club Of Ratnagiri Felicitation: रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष यिंका बाबालोला यांच्या हस्ते सत्कार

सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; एकाच महिन्यात दोन मानाचे सन्मान मिळवणारा ठरला रत्नागिरी क्लब

रत्नागिरी :

Rotary Club Of Ratnagiri Felicitation: रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष यिंका बाबालोला (Yinka Babalola) तसेच रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर एफएलटी. एलटी. के. पी. नागेश (Flt. Lt. K.P. Nagesh) यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा विशेष सत्कार करण्यात आला.

गोवा येथे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० (महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक) च्या विशेष कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, एकाच महिन्यात रोटरी इंटरनॅशनलच्या सर्वोच्च नेतृत्वातील दोन मान्यवरांच्या हस्ते असा गौरव मिळणे ही क्लबच्या कार्याची सर्वात मोठी पावती मानली जात आहे.

या सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, सचिव आनंद चौगुले, प्रेसिडेंट इलेक्ट माधुरी कळंबटे यांच्यासह लवकरच नव्याने स्थापन होणाऱ्या रोटरी क्लब ऑफ राजापूरचे प्रशांत पवार, शशांक संसारे आणि निखिल जाधव हेदेखील उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन, आरोग्य तपासणी शिबिरे, शिक्षण, कृषी विकास, अंमली पदार्थमुक्त समाज जनजागृती, तसेच समाजातील गरजू व वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी सातत्याने समाजसेवेचा वसा पुढे नेत आहे.

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीला आंतरराष्ट्रीय नेतृत्वाकडून मिळालेला हा गौरव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली असून, यामुळे क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये नव्या उमेदीने व अधिक व्यापक स्वरूपात समाजोपयोगी काम करण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-09-2026