पिकअप शेडच्या मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त
Chanderai Gambling Raid Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील चांदेराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना ‘मधूर’ नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. ही धडक कारवाई बुधवार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:१६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस हवालदार संकेत बळाराम महाडिक (वय ३५, नेमणूक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, बक्कल नं. १२४) यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संतोष विश्वनाथ सुर्वे (वय ३६, रा. भंडारवाडी चांदेराई, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष सुर्वे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून विनापरवाना ‘मधूर’ नावाचा मटका/जुगार खेळ चालवत असताना पोलिसांना रंगेहात सापडला. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि ४२० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४४७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे २ सप्टेंबर रोजी रात्री १०:१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 04-09-2026














