Ratnagiri Rainfall Update: पावसाचा जोर वाढला.. दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये दमदार हजेरी

शेती पिकांना दिलासा मिळाला तरी दुपारी कडक उन्हामुळे उकाड्यात वाढ

Ratnagiri Rainfall Update: सप्टेंबर महिना सुरू होताच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण २६०.४८ मिमी तर सरासरी २८.९४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दापोली, खेड आणि चिपळूण तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर पाहायला मिळाला, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सकाळी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी चांगला पाऊस पडत असल्याने कोकणातील भात, नाचणीसह इतर पिकांना मोठा आधार मिळाला असून शेतकरी सुखावले आहेत. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाऊस आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ टक्के पाऊस झाला असून सरासरी २ हजार ४९० मिमी इतकी नोंद झाली आहे.

गुरुवारी सकाळच्या सत्रात अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या, मात्र दुपारच्या वेळी कडक ऊन पडल्याने वातावरणातील उष्णता आणि दमटपणा प्रचंड वाढला होता. यामुळे उकाड्याने नागरिक आणि रत्नागिरीकर त्रस्त झाले होते.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)

मंडणगड: १६.२५ मिमी

दापोली: ४९.०० मिमी

खेड: ४७.२७ मिमी

गुहागर: १७.६० मिमी

चिपळूण: ४१.४४ मिमी

संगमेश्वर: १७.१७ मिमी

रत्नागिरी: १३.५५ मिमी

लांजा: २७.२० मिमी

राजापूर: ३१.०० मिमी

एकूण पाऊस: २६०.४८ मिमी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 04-09-2026