Korle Illegal Sand Mining: कोर्ले नदीपात्रात बेकायदेशीर वाळू आणि दगड उत्खनन; देवस्थान ट्रस्ट आक्रमक, प्रशासनाकडून पंचनामा

उपसरपंच मुखत्यार साटविलकर यांच्यावर जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप; लांजा तहसीलदारांकडे तक्रार

रत्नागिरी :

Korle Illegal Sand Mining: लांजा तालुक्यातील कोर्ले येथील ग्रामदेवता श्री विठुलादेवीच्या परिसर जागेतील नदीपात्रात बेकायदेशीर दगड व वाळूचे उत्खनन करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्री विठुलादेवी देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश साळूंके यांनी महसूल विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन लांजा-राजापूर प्रांत अधिकारी, लांजा तहसीलदार आणि भांबेड मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहे.

देवस्थान ट्रस्टने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोर्ले गावातील क.ग.नं. १२(अ)(ब) लगतच्या नदीपात्रातून गावाचे उपसरपंच मुखत्यार अब्दुलरहमान साटविलकर यांनी १ सप्टेंबर रोजी जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ७० ते ८० ट्रॅक्टर वाळू, दगड आणि गोट्यांचे बेकायदेशीर उत्खनन केले. तसेच हा सर्व साठा विनापरवाना जमा करून ठेवण्यात आला आहे.

देवस्थानच्या व मानकऱ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या या जागेवर कोणतीही पूर्वसूचना किंवा रीतसर परवानगी न घेता जबरदस्तीने वाळू, दगड आणि गोट्यांचे उत्खनन करून मोठा साठा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी कोर्ले ग्रामदेवता श्री आई विठुलादेवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

या प्रकरणाची महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. उत्खनन झालेल्या ठिकाणी महसूल विभाग, मंडळ अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने बुधवारी तत्काळ धाव घेऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला. मात्र, या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, सध्या केवळ चौकशी सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 04-09-2026