Rajapur Panchayat Samiti Meeting Dispute: एकात्मिक बालविकासच्या बिलावरून राजापूर पंचायत समिती सभेत खडाजंगी; उपसभापती अभिजित गुरव यांचा बचाव केल्याचा आरोप

एकाच प्रशिक्षणाची दोन वेळा बिले काढल्याचा मुद्दा तापला; एसटी फेऱ्या, शिक्षकांची पदे आणि खड्ड्यांवरूनही सदस्या आक्रमक

Rajapur Panchayat Samiti Meeting Dispute: राजापूर पंचायत समितीच्या सप्टेंबर महिन्याच्या मासिक सभेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकाच प्रशिक्षणाचे दोन वेळा बिल काढल्याच्या वादग्रस्त मुद्द्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. या विषयावर उपसभापती अभिजित गुरव यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा बचाव केला जात असल्याचा थेट आरोप केला. मात्र, सभापती नंदिनी कदम आणि शिवसेना शिंदे गटाचे गटनेते उमेश पराडकर यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट करत हा आरोप फेटाळून लावला.

राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात गुरुवारी सभापती नंदिनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा पार पडली. या सभेला उपसभापती अभिजित गुरव, गटविकास अधिकारी रोहित कुंभार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वादग्रस्त बिलाबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी लिगम यांनी सभागृहा समोर निवेदन देऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.

याशिवाय तालुक्यातील इतर गंभीर समस्यांवरही सभेत चर्चा झाली:

शिक्षण विभाग: राजापूर तालुक्यात १५२ उपशिक्षक आणि ७३ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी भोसले यांनी दिली. शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी सदस्यांनी केली.

एसटी बस फेऱ्या: राजापूर आगारात ६० ते ७० कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बसफेऱ्यांवर परिणाम होत आहे. वाढता बिबट्यांचा वावर पाहता रात्रीच्या बसफेऱ्या वेळेत सुरू ठेवाव्यात, अशी मागणी पेंढखळे गणाचे सदस्य राजेश गुरव आणि ताम्हाणे गणाच्या सदस्या समीक्षा वाफेलकर यांनी केली.

रस्त्यांचे खड्डे व झाडी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओणी-अनुस्कुरा मार्गासह तालुक्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावेत आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडी छाटावीत, असा इशारा सदस्यांनी दिला. काम पूर्ण झाल्याशिवाय बिले काढू नयेत, असेही सदस्यांनी ठणकावून सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 04-09-2026