एरडॉक्स प्लेट तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर काम; पावसाने उघडीप दिल्यास पुढील १४ दिवसांत रस्ता पूर्ण क्षमतेने खुला होणार
Amba Ghat Road Repair Ganeshotsav: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाटात गायमुखाजवळ खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अखेर प्रत्यक्ष सुरू झाले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रयत्न वेगाने सुरू केले असून ठेकेदार कंपनीला कामाबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जर पावसाने उघडीप दिली, तरच पुढील १४ दिवसांत हे दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकणार आहे.
आंबाघाटातील गायमुखाजवळ एका धोकादायक वळणावर ३० जुलै रोजी रस्ता खचला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने अवजड वाहतूक बंद करून हलकी वाहने व एसटी बस सेवा सुरू ठेवली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्ता पुन्हा खचल्यामुळे एसटी सेवेवरही पूर्ण बंदी घालावी लागली, ज्यामुळे रत्नागिरी व कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच आमदार किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर १४ ऑगस्टपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.
गेल्या १८ दिवसांपासून या मार्गावर सकाळी ७ ते सायंकाळी ७ याच कालावधीत वाहतूक सुरू असून तेथे २४ तास पोलीस व एसटी महामंडळाचे अधिकारी तैनात आहेत. सुदैवाने पाऊस ओसरल्याने खचलेला भाग स्थिर राहिला आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुण्यातील एका तज्ज्ञ संस्थेच्या मदतीने ‘एरडॉक्स प्लेट तंत्रज्ञानाचा’ (Erdox Plate Technology) वापर करून रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे.
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक चाकरमानी व नागरिक आंबा घाटमार्गाचा वापर करतात. गणेशोत्सवाला अवघे ११ दिवस शिल्लक असताना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, घाटात अवजड वाहनांना अद्याप बंदी असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या सुमारे ९०० मालवाहू गाड्यांचा मार्ग बंद आहे. परिणामी व्यापाऱ्यांना लांबच्या मार्गाने माल वाहतूक करावी लागत असल्याने अतिरिक्त वाहतूक खर्च सहन करावा लागत आहे, ज्याचा थेट फटका स्थानिक नागरिकांच्या खिशाला बसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 04-09-2026














