ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने रिटर्निंग वॉलच्या कामाला सुरुवात; पूजेच्या चौथऱ्यासाठी २४ तासांत ३५ लाखांचा निधी मंजूर
रत्नागिरी:
Khalcha Phagarwathar Landslide Retaining Wall: प्रभाग क्रमांक १ मधील खालचा फगरवठार येथे दरड कोसळून रस्ता खचल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेची तातडीने दखल घेत स्थानिक नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी ३० जून २०२६ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय लावून धरला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करून रिटर्निंग वॉलचे (संरक्षक भिंत) काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
या विषयाची गांभीर्याने दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना रिटर्निंग वॉलचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, यापूर्वीची रिटर्निंग वॉल नेमकी कशामुळे कोसळली, याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
नामदार उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांतच रिटर्निंग वॉलच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. याशिवाय, रिटर्निंग वॉलच्या पुढील भागात असलेल्या पूजेच्या चौथऱ्याला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून, लगतची जीर्ण संरक्षण भिंत नव्याने बांधण्यासाठी अवघ्या २४ तासांत सुमारे ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
प्रशासनाच्या या तत्पर कार्यवाहीमुळे खालचा फगरवठार परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सुरक्षिततेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. या तातडीच्या मदतीबद्दल प्रभाग क्र. १ मधील सर्व नागरिक आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी नामदार उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-09-2026














