अवघ्या १० दिवसांपूर्वीच खुला झालेला किनारा पुन्हा सील; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनंतर प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स
Ganpatipule Beach Closed For Tourists: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारपासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनारा मागील सुमारे दोन महिन्यांपासून समुद्रातील तीव्र लाटा आणि धोकादायक स्थितीमुळे बंद ठेवण्यात आला होता. समुद्राची स्थिती काहीशी सुधारल्याचे पाहून सुमारे दहा दिवसांपूर्वीच हा किनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. मात्र, समुद्रात पुन्हा एकदा उधाण आणि धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रकिनारा तात्काळ बंद करण्याचे आदेश गणपतीपुळे ग्रामपंचायतीला दिले.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी या निर्णयाबाबत अधिकृत माहिती दिली. समुद्रकिनारा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांनी प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी सलग दोन महिने किनारा बंद राहिल्यामुळे स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून किनारा खुला करण्यात आला होता.
मात्र, अवघ्या १० दिवसांच्या कालावधीतच समुद्राची स्थिती पुन्हा धोकादायक बनल्याने प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागले आहे. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी किनाऱ्याकडे जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गांवर बॅरिकेट्स लावण्यात आले असून, प्रवेशबंदीचे सूचना फलकही उभारण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 04-09-2026














