Maharashtra State Credit Societies Federation AGM Ratnagiri: राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा रत्नागिरीत संपन्न; पोटनियमात सुधारणांसह ठेव संरक्षणासाठी शासनाच्या भरीव योगदानाची मागणी

ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सहकार महामेळावा; प्रत्येक पतसंस्थेने दरमहा १० नवीन युवकांना जोडण्याचे अध्यक्षांचे आवाहन

Maharashtra State Credit Societies Federation AGM Ratnagiri: महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अभ्यासवर्ग १ व २ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात आणि संस्था प्रतिनिधींच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पतसंस्थांचे प्रतिनिधी या सहकार महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सभेमध्ये फेडरेशनच्या पोटनियमात अनेक महत्त्वाचे बदल मंजूर करण्यात आले. फेडरेशनचे वर्गीकरण “अन्य संस्था” या प्रकारात करण्यास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे आणि जोपर्यंत योग्य व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत संस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वपूर्ण ठराव या सभेमध्ये संमत करण्यात आला. तसेच, पतसंस्थांना ‘क्रेडिट इन्स्टिट्यूशन’ म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्रीय कायद्यातील तरतुदींचा वापर आरबीआयने (RBI) करावा आणि पतसंस्थांची वाढती उलाढाल लक्षात घेऊन त्यांची श्रेणीनिहाय वर्गवारी करून पूरक धोरण आखावे, यासाठी प्रयत्न करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

दोन महिन्यांत कागदपत्रांची आदर्श नमुना पुस्तिका प्रकाशित होणार: पतसंस्थांमधील प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्याची घोषणा करण्यात आली. संस्थांचे व्यवहार कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी अर्ज, करार आणि रोखे यांसारख्या सर्व कागदपत्रांची ‘आदर्श नमुना पुस्तिका’ पुढील दोन महिन्यांत प्रकाशित केली जाईल, अशी घोषणा फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली. संस्थांनी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह व शिस्तप्रिय करण्यासाठी सजग राहण्याचे सांगतानाच, प्रत्येक संस्थेने दरमहा किमान १० नवीन युवकांना आपल्या संस्थेशी जोडण्याचा उपक्रम अग्रक्रमाने राबवावा, असे आवाहन पटवर्धन यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

अभ्यासवर्ग आणि दिग्गजांची उपस्थिती: या अभ्यासवर्गाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अभय माटे, डॉ. सोपान शिंदे आणि सुहास पाटणकर यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. विशेषतः अभय माटे यांनी डीपीडीपी (DPDP) कायदा व डेटा संरक्षणावर उद्बोधक व्याख्यान दिले.

या कार्यक्रमास फेडरेशनचे सरचिटणीस राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले, श्री. छाबडा, प्रा. श्री आकरे, श्री. वाजे, श्री. तांबेकर, श्री. बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे यांच्यासह सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. राऊळ, डीसीसी बँकेचे संचालक सचिन भिंगारडे, शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी पतसंस्थेचे अध्यक्ष मांडवकर आणि नागपूर जिल्हा फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र घाटे यांसारखे सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या भव्य आयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (RDCC) मोलाचे सहकार्य लाभले. ऐन श्रावण मासात रत्नागिरीत पार पडलेला हा सहकार महामेळावा अत्यंत यशस्वी व लक्षणीय ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 04-09-2026