Nivali Flyover One Way Traffic Started: मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी उड्डाणपुलावरून अखेर एकेरी वाहतूक सुरू; चाकरमान्यांना मोठा दिलासा

गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरी ते मुंबई मार्ग खुला; मात्र सर्व्हिस रोडच्या दयनीय अवस्थेमुळे अपघाताचा धोका कायम

Nivali Flyover One Way Traffic Started: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतिक्षित निवळी येथील फ्लायओव्हरवरून (उड्डाणपूल) अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील पूल पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होण्याची प्रवासी व वाहनचालक वाट पाहत होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक या उड्डाणपुलावरून सोडण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक सध्या या उड्डाणपुलावरून बंद ठेवण्यात आली असून, या बाजूच्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असताना या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था: दुसरीकडे, निवळी येथील सेवारस्त्याची (सर्व्हिस रोड) अवस्था अत्यंत बिकट आणि दयनीय झाली आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि खराब झालेल्या पृष्ठभागामुळे येथून गाड्या चालवणे वाहनचालकांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्य उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाली असली तरी सेवारस्त्याची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत वाहनांची संख्या प्रचंड वाढणार असल्याने प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.

अधिकृत माहितीनुसार, निवळी आणि कोलाड उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यात आली असली तरी काही तांत्रिक अडचणी व अपूर्ण कामांमुळे गणेशोत्सवादरम्यान या भागातून वाहतूक काही प्रमाणात संथ गतीने चालण्याची किंवा सेवारस्त्यांवरून वळवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 04-09-2026