Phanaswale Illegal Cattle Slaughter Case Ratnagiri: फणसवळेत गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार: दोघांना अटक, दोघे पसार; जनावरांसह इनोव्हा कार, इंजेक्शन्स, हत्यारे जप्त

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर धारदार हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी

Phanaswale Illegal Cattle Slaughter Case Ratnagiri: रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे-वेतोशी गावच्या वेशीवरील जंगलात पुन्हा एकदा बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गस्तीदरम्यान माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या ग्रामीण पोलिसांशी तीन संशयितांनी हुज्जत घालून धारदार हत्याराने हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, दोघे संशयित पसार झाले आहेत. या धाडीत पोलिसांकडून तीन गोवंशीय जनावरे, एक इनोव्हा कार, गोवंशीय जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स आणि कत्तलीसाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन बाबू कुरेशी (वय ३०, रा. मुंबई पूर्व) व शेहेनशहा अब्दुल सत्तार शेख (४८, रा. माहीम मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. तर अस्लम कुरेशी (वांद्रे कुर्ला मुंबई) व देवा (रा. विरार) हे दोघे फरार आहेत.

गोमांसाची मुंबईला विक्री:
संशयितांकडून अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत एका गोवंशीय जनावराचे मांस काढण्यात येत होते. मध्यरात्री १ ते पहाटे ४ या कालावधीत संशयित गोवंशीय जनावरांचे मांस काढून त्याची मुंबईला विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

इनोव्हाला बनावट नंबर:
संशयितांकडून ताब्यात घेतलेल्या इनोव्हा कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आली आहे. या इनोव्हा कारला लावण्यात आलेला नंबर प्लेटवरील नंबर एका रिक्षाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश:
जून महिन्यात फणसवळे येथे गोवंशीय हत्येचा गुन्हा घडला होता. त्यानंतर ग्रामीण पोलिसांकडून त्या अनुषंगाने वारंवार तपास सुरू होता. त्या परिसरात दररोज २-२ तासांनी गस्त घालताना ग्रामस्थ व पोलीस पाटील यांना जागृत केले जात होते. अखेर २ महिन्यांनंतर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले.

बुधवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस हवालदार संकेत महाडिक, सागर साळवी, चालक तेरवणकर यांची टीम परिसरात गस्त घालत होती. गस्तीदरम्यान त्यांना एक गोवंशीय जनावर कापलेल्या अवस्थेत तर इतर दोन बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. बाजूलाच झाडीत इनोव्हा कार दिसून आली. पोलिसांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयित अस्लम शेखने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि धारदार हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कौशल्याने दोघांना जागीच झेप घेऊन ताब्यात घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 04-09-2026