Ganeshotsav Traffic Regulations Ratnagiri: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा-बस वाहतूकदारांची संयुक्त बैठक; गणेशोत्सवात रिक्षा, बस वाहतुकीवर प्रशासनाची करडी नजर

अवाजवी भाडे आकारल्यास कठोर कारवाईचा इशारा; प्रवाशांची सुरक्षा व सोयीसाठी वायूवेग पथके ठेवणार लक्ष

Ganeshotsav Traffic Regulations Ratnagiri: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक टाळण्याच्या कडक सूचना शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित रिक्षा व बस वाहतूकदारांच्या संयुक्त बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्यासह पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी तसेच रिक्षा आणि बस वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामार्गावर होणारी गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन परिवहन विभागाने हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवासाचा मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महामार्गावर जिथे रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, तिथे अपघात टाळण्यासाठी तत्काळ रस्ता सुरक्षा फलक, रेडियम टेप्स आणि ब्लिंकर्स बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व नॅशनल हायवेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. उत्सव कालावधीमध्ये महामार्गावर ‘वायूवेग पथकां’ची (Flying Squads) सतत गस्त असणार आहे. प्रवासादरम्यान जर कोणाचे वाहन अचानक बंद पडले किंवा एखादी दुर्घटना घडली, तर बाधित प्रवाशांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल.

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आणि प्रवाशांची कोणतीही फसवणूक होऊ नये, म्हणून रिक्षा आणि खासगी बस संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणाऱ्या किंवा प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारला जाणार असून, यासाठी उत्सवाच्या काळात वायूवेग पथके विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. विसर्जनाचे दिवस आणि गर्दीच्या मोसमात महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे; मात्र अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहने या नियमातून वगळण्यात आली आहेत.

सर्वसामान्यांचा हा लाडका गणेशोत्सव कोणत्याही विघ्नशिवाय आणि आनंदाने पार पडावा, यासाठी सर्व नागरिकांनी व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 04-09-2026