NCMC Smart Card Ratnagiri: सर्व्हर डाऊनमुळे ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड नोंदणी खोळंबली; एसटी बसस्थानकात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हाल

कार्ड नसल्यास नोंदणीची पावती ग्राह्य धरणार; महाव्यवस्थापकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची दिली मुभा

NCMC Smart Card Ratnagiri: एसटी महामंडळाचे एनसीएमसी (NCMC) कार्ड ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे रत्नागिरी एसटी बस स्थानकात सवलतधारकांची मोठी गर्दी उसळली आहे. सर्व्हर डाऊनमुळे नवीन कार्ड नोंदणी आणि कार्ड ॲक्टिव्हेशनला प्रचंड वेळ लागत असून, स्मार्ट कार्ड रिचार्ज होत नसल्याने महिला, तरुणी व वयोवृद्ध प्रवाशांना दिवसभर रांगेत ताटकळावे लागत आहे.

रत्नागिरी बसस्थानकावर गुरुवारी सकाळी ८:३० वाजल्यापासूनच रिचार्ज आणि नवीन नोंदणीसाठी काउंटरवर प्रवाशांची गर्दी झाली होती. तासंन्तास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने प्रवासी आणि स्मार्ट कार्ड एजंट यांच्यात वाद होऊन हमरीतुमरीच्या घटना घडत आहेत. महाव्यवस्थापकांनी स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही, काही वाहकांनी टॉपअप न केलेल्या सवलतधारक प्रवाशांना थेट बसमधून उतरवले किंवा रिचार्जअभावी पूर्ण तिकिटाचा मुर्दंड सोसावा लागल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नोंदणी पावती असणाऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रवासाची मुभा

प्रवाशांचा वाढता त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केली आहे, परंतु अद्याप त्यांना प्रत्यक्ष कार्ड प्राप्त झालेले नाही, त्यांना नोंदणीची पावती ग्राह्य धरून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे स्पष्ट आदेश रत्नागिरीसह सर्व जिल्ह्यांतील आगारांना देण्यात आले आहेत.

स्थानिक प्रतिक्रिया आणि वस्तुस्थिती

सकाळी साडेआठ वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड रिचार्ज होत नसल्याची खंत ज्येष्ठ प्रवासी आरती गायकवाड यांनी व्यक्त केली. एनसीएमसी कार्डची सेवा पूर्णपणे सुरळीत आणि नियंत्रित होईपर्यंत रिचार्ज व कार्डसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे, एनसीएमसी कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी व नवीन नोंदणीसाठी काउंटर सुरू केले असले तरी सर्व्हर डाऊन असल्याने काम रेंगाळत असल्याचे स्मार्ट कार्ड एजंट संदीप चव्हाण यांनी सांगितले. या परिस्थितीबाबत वरिष्ठांना कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

१ ते ३ सप्टेंबरदरम्यान एनसीएमसी कार्ड असूनही ते रिचार्ज नसल्याचे कारण देत वाहकांनी अप्रत्यक्ष अडवणूक करून पूर्ण तिकिटाची रक्कम वसूल केल्याचे प्रकारही समोर आले आहेत. सध्या प्रशासनाने १४ सप्टेंबरपर्यंत प्रवास करण्यास आणि पावतीवर ३० सप्टेंबरपर्यंत मुभा दिली असली तरी तांत्रिक यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 04-09-2026