Ratnagiri Grahak Peth Shravan Mahotsav Exhibition: रत्नागिरीत महिला उद्योजिकांसाठी ‘श्रावण महोत्सव’ प्रदर्शन व विक्री; ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान माळनाका येथे आयोजन

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिलांना हक्काचे व्यासपीठ; मंगळागौर, मेकअप प्रात्यक्षिकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Ratnagiri Grahak Peth Shravan Mahotsav Exhibition: उद्योगिनी महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे श्रावण महोत्सवानिमित्त भव्य वस्तू प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर ते मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत माळनाका येथील जयेश मंगल कार्यालयात हे प्रदर्शन पार पडणार असून, दररोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत ते नागरिकांसाठी खुले राहील.

या प्रदर्शनात कोकण मेवा, विविध घरगुती उत्पादने, आयुर्वेदिक औषधे, लिनन, सिल्क व कॉटन साड्या, सौंदर्य प्रसाधने, डिझायनर कुर्ती, ज्वेलरी, हस्तकला वस्तू, ड्रेस मटेरियल्स आणि पर्स उपलब्ध असणार आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजेचे व सजावटीचे साहित्य, विविध प्रकारच्या ब्रँडेड अगरबत्त्या किरकोळ व घाऊक दरात मिळतील. याशिवाय विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थ, केक, बर्गर आणि फ्रेंच फ्राईजचा आनंदही पर्यटकांना घेता येईल.

४ दिवस रंगणार विविध कार्यक्रम: प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • शनिवार, ५ सप्टेंबर: सकाळी ११:३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन; सायंकाळी ८ वाजता प्रश्नमंजुषा व मनोरंजक खेळ.
  • रविवार, ६ सप्टेंबर: दुपारी ३ वाजता ‘फेस्टिव्हल व सेल्फ मेकअप’ प्रात्यक्षिक; सायंकाळी ८:३० वाजता कारवांचीवाडी येथील गौरीई ग्रुपतर्फे मंगळागौरीचे खेळ.
  • सोमवार, ७ सप्टेंबर: दुपारी ३:३० वाजता विपश्यना आणि ‘आनापान’ प्रात्यक्षिक (मार्गदर्शिका: सौ. युगंधरा राजशिर्के, ट्रस्टी, विपश्यना सेंटर).
  • मंगळवार, ८ सप्टेंबर: सायंकाळी ८ वाजता लायन्स क्लब रत्नागिरी इंटरनॅशनलच्या सेवाभावी उपक्रमांची माहिती.

दरम्यान, प्रदर्शनातील सर्व स्टॉल्समधून दोन ‘आदर्श स्टॉल्स’ची निवड लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे केली जाणार आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राची शिंदे (मो. ९४२२३७६२२४ / ९७६४४१७०७९) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 04-09-2026