चार मंत्र्यांचा राजीनाम्यास नकार आणि संघाकडून उपपंतप्रधानपदाची मागणी; मोदी-शाहांची दहशत संपल्याचा राऊतांचा दावा
बातमी:
Sanjay Raut On Narendra Modi Birthday BJP Rift: येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून, याच काळात भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीची सुरुवात झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळेच मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) फेरबदलात मोदींचा वारस म्हणून उपपंतप्रधान नियुक्त करण्याची मागणी केली आहे, ज्यातून मोदी-शाहांच्या दहशतीला ब्रेक लागल्याचे स्पष्ट होते,” असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
कोल्हापूर येथे आयोजित एका मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. “तुम्ही वारंवार १७ सप्टेंबरला काहीतरी मोठे घडणार असे म्हणता, नक्की काय होणार?” असा प्रश्न विचारला असता, राऊत यांनी थेट भाजपमधील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवले.
‘राजीनाम्याला मंत्र्यांचा स्पष्ट नकार’: भाजपमधील परिस्थितीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “गेल्या १० वर्षांत मोदी आणि अमित शाह यांची पक्षात असणारी दहशत आता राहिलेली नाही. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यासाठी जुन्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात. मात्र, संघ परिवाराशी संबंधित असलेल्या चार महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. ‘आम्हीच राजीनामा का द्यायचा? आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या’ असा सवाल हे मंत्री विचारत आहेत. हे भाजपमधील बंडाचे आणि मोदींच्या पतनाचे पहिले लक्षण आहे.”
‘संघाकडून वारसाची मागणी’: संघाच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत पुढे म्हणाले, “संघाला आता नवीन ऊर्जा मिळाली आहे. त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात उपपंतप्रधानपद निर्माण करून मोदींचा वारसदार ठरवण्याची मागणी केली आहे, आणि तो वारस नक्कीच अमित शाह नसतील. आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदींच्या प्रतिमेला तडे गेले असून, जागतिक वर्तुळात त्यांची पत घसरली आहे. त्यामुळे एकदा भाजपच्या अधोगतीची गाडी सुरू झाली की तिची गती वेगाने खालीच जाणार आहे,” असा दावाही त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:58 04-09-2026














