Maharashtra State Drama Competition Online Entry: विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांच्या ऑनलाईन प्रवेशिकांचे आवाहन; २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे निर्देश

१६ नोव्हेंबर २०२६ पासून होणार नाट्यरंगाची सुरुवात; हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृतसह बालनाट्य स्पर्धांचे भव्य आयोजन

Maharashtra State Drama Competition Online Entry: सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यंदाही विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक नाट्य संस्थांनी येत्या २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपल्या ऑनलाईन प्रवेशिका सादर कराव्यात, असे अधिकृत आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून हौशी मराठी, हिंदी, संगीत आणि संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या मुख्य स्पर्धांसोबतच बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार, २३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून राज्यातील विविध १० केंद्रांवर पार पडेल. तसेच ६५ व्या हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी प्रत्येकी एका निश्चित केंद्रावर आयोजित केली जाणार आहे.

नोंदणीकृत नाट्य संस्था तसेच मागील वर्षीच्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज आणि नियमावली महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरलेल्या प्रवेशिका निर्धारित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करायच्या आहेत.

नियम व अटींचे पालन बंधनकारक: स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेला जर एखाद्या संस्थेने नाट्यप्रयोग सादर केला नाही, तर प्रवेश अर्जासोबत भरलेली अनामत रक्कम जप्त करून ती शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच नाट्य स्पर्धेसाठी शासनाने निश्चित केलेले सर्व नियम संबंधित संस्थांवर बंधनकारक असतील; नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 04-09-2026