Wrestler Ashwini Paul Death Dharashiv Update: राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; ५ वर्षांच्या मुलासह स्वतःचा अंत, जुळ्या मुली गंभीर

धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना; किल्ल्यावर केक कापल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल, सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

Wrestler Ashwini Paul Death Dharashiv Update: कुणाल चांदगुडे आणि त्यांच्या आई-वडिलांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच, महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. १०० फूट उंच बुरुजावरून मारलेल्या उडीत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या जुळ्या मुली अत्यंत गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १:५० वाजण्याच्या सुमारास अश्विनी यांनी दोन जुळ्या मुली आणि ५ वर्षांच्या अजिंक्यसह नळदुर्ग किल्ल्यात प्रवेश केला होता. किल्ल्यावर त्यांनी मुलांसोबत केक कापून वाढदिवस/सेलिब्रेशन केले. त्यानंतर किल्लेदारांना “माझे मिस्टर अर्ध्या तासात येत आहेत” असे सांगून त्या आत गेल्या; मात्र पती न आल्याने त्यांनी तिन्ही मुलांना सोबत घेऊन बुरुजावरून थेट खाली उडी घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन चौघांनाही रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी अश्विनी व अजिंक्य या दोघांना मृत घोषित केले. तर दोन्ही मुलींना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मुलींचे आजोबा (अश्विनी यांचे वडील) तान्हाजी शिवाजी मोहिते (रा. शिक्षक) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा थेट आरोप केला आहे.

मानसिक त्रासातून नोकरी सोडली होती: अश्विनी पौळ या मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) सेवेत होत्या आणि त्यांनी कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले होते. मात्र, पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच नोकरीचा राजीनामा दिला होता आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्या आपल्या मुलांसह माहेरी राहत होत्या. सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून सखोल तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 04-09-2026