Chiplun Flyover Service Road Traffic: चिपळूणात चाकरमान्यांची वाहने आता सर्व्हिस रोडवरूनच धावणार; उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचे भरावाचे काम जागरूक नागरिकांनी थांबवले

गणेशोत्सवात उड्डाणपूल सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी; दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची डागडुजी सुरू

Chiplun Flyover Service Road Traffic: गणेशोत्सवापूर्वी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी चिपळुणातील बहुचर्चित उड्डाणपूल खुला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कसोशीने प्रयत्न केले होते. उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचा प्रलंबित असलेला भराव (Earth filling) पावसातच पूर्ण करून पुलावरून हलकी वाहने सोडण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू होती. मात्र, धोकादायक भरावाचे काम थांबवण्याचा आग्रह काही जागरूक नागरिकांनी धरल्यानंतर अखेर प्रशासनाने नमते घेतले असून उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सर्व्हिस रोडवरूनच चाकरमान्यांची वाहने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात उड्डाणपूल खुला करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम तब्बल ९५ टक्के पूर्ण झाले असून सर्व स्लॅबचे काम संपले आहे. सध्या पुलावर साफसफाई आणि काही ठिकाणी साईडच्या संरक्षक कटड्यांचे काम सुरू आहे. गणेशोत्सवात हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरू व्हावा, यासाठी शहरातील अतिथी हॉटेल ते प्रांताधिकारी कार्यालय दरम्यानच्या भागात सुमारे २० फूट उंचीचा भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ५ फुटांचा भराव पूर्ण झाल्यानंतर त्यावरून हलकी वाहने सोडण्याचे नियोजन होते; परंतु इतक्या मोठ्या उंचीचा भराव पावसात करणे धोकादायक ठरेल, हे स्पष्ट झाल्याने अखेर हे काम थांबवण्यात आले.

उड्डाणपूल यंदा गणेशोत्सवात सुरू होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीने सर्व्हिस रोड सुस्थितीत ठेवण्यावर भर दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात लांब असलेल्या या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची रुंदीकरण, खड्डे भरणे, साफसफाई आणि आवश्यक तेथे डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक सुरळीत राहील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 04-09-2026