१६ व्या वित्त आयोगातून स्पष्ट तरतूद नसल्याने अडचण; रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन
रत्नागिरी :
Ratnagiri Computer Operator Honorarium Issue: ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध ऑनलाईन सेवा आणि प्रशासकीय कामकाजाचा भार वाहणाऱ्या संगणक परिचालकांचा मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संपूर्ण डिजिटल कामकाज सांभाळणारे संगणक परिचालक सध्या तीव्र आर्थिक अडचणीत सापडले असून, जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे थकीत मानधन तातडीने बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेने राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
या गंभीर समस्येबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री उदय सामंत तसेच राजापूरचे आमदार किरण सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी शासनाने १६ व्या वित्त आयोगातून कोणतीही स्वतंत्र तरतूद केलेली नाही, असा मुद्दा निवेदनात अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच हे मानधन नेमक्या कोणत्या निधीतून आणि कोणत्या पद्धतीने वितरित करायचे, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी न झाल्याने मानधन रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दैनंदिन ग्रामपंचायतींच्या कारभारात, ऑनलाईन दाखले देण्यामध्ये, शासकीय नोंदी व विविध अर्ज प्रक्रियांमध्ये संगणक परिचालकांची भूमिका अत्यंत कळीची आहे. मात्र, अहोरात्र जबाबदारीने काम करूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
निवेदन सादर करताना रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष समीर गोताड, कार्याध्यक्ष आसिफ नाकाडे, सचिव भूषण सुर्वे, खजिनदार नीलेश शिंदे, संपर्कप्रमुख वैभव गुरव, किरण कुळ्ये, माजी लांजा तालुकाध्यक्ष संतोष कांबळे आणि संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रवीण यादव उपस्थित होते.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सणासुदीची खरेदी, घरगुती खर्च व मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे मानधन रखडल्याने परिचालकांसमोर मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच सर्व थकीत मानधन अदा करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा, अशी विनंती संघटनेने केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 04-09-2026














