खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नानंतर सुनेत्रा पवारांचे वक्तव्य; तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्टीकरण
Sunetra Pawar Statement Ajit Pawar Death Inquiry: “दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, दादांच्या आई, त्यांची मुले आणि माझ्यापेक्षा मोठे दुःख कोणालाही असू शकत नाही. त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे कोणीही राजकारण करू नये,” अशी भावनिक आणि आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मांडली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत आणि एफआयआर (FIR) न नोंदवण्याबाबत केलेल्या विधानानंतर सुनेत्रा पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले.
तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझा देशाच्या कायदा, संविधान आणि तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही स्वतः दादांच्या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करत आहोत. मात्र, प्रत्येक गोष्ट मीडियासमोरच केली पाहिजे असे नाही. सातत्याने मीडियामध्ये बोलल्याने वारंवार ‘मीडिया ट्रायल’ होते की काय अशी शंका निर्माण होते.”
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट: प्रकरणाच्या पाठपुराव्याविषयी माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही या संदर्भात स्वतः आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेतली आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत या चौकशीबाबत शब्द दिला आहे आणि ते त्यादृष्टीने कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांना योग्य तो वेळ दिला पाहिजे.”
खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? मनसे नेते अमित ठाकरे यांचा फोटो हटवल्याप्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल केला जातो, मग राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या माझ्या भावाचा (अजित पवार) एवढा मोठा अपघात होऊन मृत्यू झाला, तरी आजपर्यंत एफआयआर का नोंदवला गेला नाही? असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. सरकारमध्ये अजूनही अजितदादांच्या विचारांचे ४० आमदार असताना माझ्या भावाला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. सुप्रिया सुळेंच्या याच वक्तव्याचा समाचार घेत सुनेत्रा पवारांनी यावर राजकीय भाष्य टाळण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 04-09-2026














