Western Ghats Ecologically Sensitive Area Ratnagiri: पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात रत्नागिरीतील तब्बल ३११ गावे; ५ तालुक्यांचा समावेश

६० दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे केंद्र सरकारचे आवाहन; खेड तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांचा समावेश

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्र ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ (Ecologically Sensitive Area – ESA) म्हणून घोषित करण्यासाठी नवीन मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मसुद्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील तब्बल ३११ गावांचा या संवेदनशील क्षेत्रात समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिक, जमीनधारक आणि स्थानिक हितसंबंधितांचे लक्ष पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे लागले आहे.

Western Ghats Ecologically Sensitive Area Ratnagiri: खेड तालुक्यात सर्वाधिक गावे

उपजिल्हाधिकारी (महसूल) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय प्रस्तावित समावशेात खेड तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्याखालोखाल संगमेश्वर ८१, राजापूर ५१, लांजा ५० आणि चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यातील १३ जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील एकूण २ हजार ५१५ गावांचा समावेश या मसुदा अधिसूचनेत करण्यात आला आहे. अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी नागरिकांना आणि स्थानिक रहिवाशांना आपापल्या हरकती व सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

६० दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन

पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीवनमानावर, जमिनींच्या वापरांवर आणि विकासात्मक हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मसुदा अधिसूचनेवर प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नागरिक आपले आक्षेप आणि हरकती नोंदवू शकतात.

नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात ‘पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३’ या पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:26 08-09-2026