Ratnagiri Ration Shopkeepers Strike: ई-पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाडाविरोधात रत्नागिरीत रेशन दुकाने बंद; संपामुळे लाभार्थी हैराण

सर्व्हर समस्येवर तोडगा न निघाल्याने ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचा एल्गार; जिल्ह्यात आंदोलनाला १००% पाठिंबा

रत्नागिरी : ई-पॉस (e-POS) मशीनमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या आणि सर्व्हर डाऊनच्या प्रकारांवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवारी (७ सप्टेंबर) ई-पॉस मशीन बंद ठेवून राज्यव्यापी आंदोलन छेडले. या आंदोलनाला ‘रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने’ १०० टक्के पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने दिवसभर बंद राहिली, ज्यामुळे धान्य वितरणाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली होती.

Ratnagiri Ration Shopkeepers Strike: सर्व्हरच्या समस्येमुळे ग्राहक अन् दुकानदारांत वाद

या आंदोलनाबाबत जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रीतसर निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, केंद्र शासनाकडून एनआयसीच्या (NIC) माध्यमातून ई-पॉस मशीनला पुरवण्यात येणारी इंटरनेट सर्व्हर सेवा गेल्या काही महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. यामुळे रेशन दुकानांवर धान्य खरेदीसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. अनेकदा सर्व्हर बंद पडल्याने लाभार्थ्यांना धान्याशिवाय रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. या तांत्रिक अडचणींमुळे रास्त भाव धान्य दुकानदार आणि ग्राहक यांच्यात दररोज नाहक वाद निर्माण होत आहेत.

२१ ऑगस्टच्या निवेदनानंतरही सुधारणा नाही

या गंभीर प्रश्नावर ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनच्या राज्य शाखेने २१ ऑगस्ट रोजी शासनाला लेखी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही सर्व्हरच्या परिस्थितीत कोणतीही अपेक्षित सुधारणा झाली नाही. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेच्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन्स बंद ठेवून धान्य वितरण पूर्णपणे रोखले. ई-पॉस मशीनमधील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून सुरळीत धान्य वितरणाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी दुकानदारांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:10 08-09-2026