Sanjay Raut On National Film Awards Gujarat: ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतच व्हावा’; खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती हल्ला

  • ७२ वर्षांची परंपरा मोडून सोहळा गुजरातला नेल्याने विरोधक आक्रमक; कलाकारांना गुजरातला न जाण्याचे आवाहन

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) वितरण सोहळा आपल्या ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच देशाची राजधानी दिल्लीबाहेर आयोजित केला जाणार आहे. यंदा हा प्रतिष्ठेचा सोहळा गुजरातमध्ये पार पडणार असून, या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशाची संपत्ती आणि राष्ट्रीय अभिमान एकाच राज्याकडे वळवत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut On National Film Awards Gujarat: ‘मोदी देशाचे की केवळ गुजरातचे पंतप्रधान?’

पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले, “नॅशनल फिल्म फेस्टिव्हलसारखा राष्ट्रीय उत्सव गेली ७२ वर्षे देशाच्या राजधानीत होत होता. तोसुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन चालला आहात. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की केवळ गुजरातचे? मंत्रिमंडळ गुजरातचे आहे का? राष्ट्रीय पुरस्कार सोहळा देशाच्या राजधानीतच झाला पाहिजे. पुरस्कार घेण्यासाठी कलाकारांनी गुजरातला का जावे?”

ते पुढे म्हणाले, “मी असे म्हणत नाही की, हा सोहळा मुंबई किंवा लखनऊमध्ये झाला पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची एक परंपरा आहे आणि हे पुरस्कार महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. असा सोहळा तुम्ही अचानक गुजरात किंवा अहमदाबादला कसा काय घेऊन जाऊ शकता?”

स्वाभिमान असेल तर कलाकारांनी गुजरातला जाऊ नये

कलाकारांना आवाहन करताना संजय राऊत म्हणाले, “ज्या कलाकारांना देशाविषयी स्वाभिमान आहे, त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी गुजरातला जाऊ नये. नॅशनल फिल्म अवॉर्ड सोहळा दिल्लीतच व्हावा यासाठी आग्रही राहिले पाहिजे. इतर सर्व राज्यांचे महत्त्व कमी करायचे आणि देशात गुजरात हे एकमेव राज्य आहे, बाकी सगळे त्यांचे गुलाम आहेत अशा मनोवृत्तीतून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह काम करत आहेत.”

‘मोदी स्वतःला गुजरातचे पंतप्रधान समजतात’

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “मी कोणत्याही राज्यावर टीका करत नाही; पण राष्ट्रीय सोहळे देशाच्या राजधानीत न होता, भविष्यात गुजरातमध्ये निवडणूक आहे म्हणून तिथे आयोजित केले जात असतील, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. भिंतींवरून मोदींचे फोटो हटवले जात आहेत, त्याचे समर्थन यासाठीच होत आहे. कारण हे सद्गृहस्थ स्वतःला देशाचे नव्हे तर केवळ गुजरातचे पंतप्रधान समजतात.”

तसेच सत्ताधाऱ्यांकडून आंदोलनांना राजकीय हत्यार म्हटले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “विरोधी पक्षाचे कामच काय असते? तुम्ही सत्तेत नसताना काय केले असते? गाडीभर पुरावे घेऊन येणार होतात, मग काय झाले त्या पुराव्यांचे?” असा रोखठोक सवालही त्यांनी शेवटी विचारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:10 08-09-2026