Nandivase Shimgot sav Chiplun Court Verdict: नांदिवसे शिमगोत्सव मानपानावर चिपळूण न्यायालयाची मोहर; रूढी-परंपरा घटनाबाह्य नसल्याचा ऐतिहासिक निकाल

तीन दशकांपासूनच्या वादावर पडदा; पूर्वीच्या परंपरेनुसार शिमगोत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा

चिपळूण : शिमगोत्सवातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले मानपान, रूढी-परंपरा आणि पूजा-अर्चा घटनाबाह्य नसून पूर्णपणे योग्यच आहेत, असा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्वाळा चिपळूण येथील जिल्हा न्यायालयाने दिला आहे. नांदिवसे (तालुका चिपळूण) येथील शिमगोत्सव मानपान प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मानकरी मंदिर देवस्थानचे मालक नसले तरी त्यांच्या श्रद्धेला आणि मानपानाच्या हक्काला ठेच पोहोचवता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

Nandivase Shimgot sav Chiplun Court Verdict: ३५ वर्षांच्या प्रदीर्घ वादावर पडदा

चिपळूण न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे नांदिवसे येथील शिमगोत्सावातील गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून (३५ वर्षांपासून) सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, पूर्वीच्या परंपरेनुसार पारंपारिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायमूर्ती डी. बी. माल्हाटकर यांनी तब्बल ७० पानांचा सविस्तर निकाल देत प्रतिवादींचे अपील फेटाळून लावले. नांदिवसे येथील शिमगोत्सावातील मानपान व परंपरांवरून १९८८-८९ सालापासून वाद सुरू होता. हा वाद पुढे मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. उच्च न्यायालयाने त्यावेळी शिमगोत्सवावरील बंदी उठवून उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली होती आणि मानपानाचे हक्क निश्चित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते.

चिपळूणच्या वकिलांचा प्रभावी युक्तिवाद

या खटल्यात चिपळूणस्थित विधिज्ञ अॅड. संदेश उर्फ बंटी भोसले, अॅड. इंद्र भोसले, अॅड. अरमान खान व अॅड. अश्विनी बेलोसे यांनी मानकरी व परंपरांच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद केला. कोकणातील शिमगोत्सवाच्या रूढी-परंपरा, धार्मिक विधी व मानपान याबाबतचे विविध न्यायालयीन दाखले न्यायालयात सादर करण्यात आले.

कोकणातील अनेक गावांमधील शिमगोत्स्वांमध्ये मानपान व परंपरांवरून मतभेद आणि वाद असल्याने, चिपळूण जिल्हा न्यायालयाने नांदिवसे प्रकरणात दिलेला हा निकाल संपूर्ण कोकणासाठी अतिशय महत्त्वाचा व मार्गदर्शक मानला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:34 08-09-2026