PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

  • गुजरातमध्ये ३५ हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण; मुंबईत सायंकाळी महत्त्वाचा कार्यक्रम

मुंबई / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (८ सप्टेंबर) गुजरात आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत त्यांच्या हस्ते ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’ चे उद्घाटन होणार आहे. तर तत्पूर्वी गुजरात राज्यातील वडोदरा येथे पंतप्रधानांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडणार आहे.

PM Narendra Modi Mumbai Visit: मुंबईत सायंकाळी ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सायंकाळी सुमारे ५:४५ वाजता मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. ‘पोटेन्शियल टू इम्पॅक्ट : एजंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम – ट्रस्टेड, कनेक्टेड, ग्लोबल सिस्टीम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स’ ही यंदाच्या फेस्टची मध्यवर्ती संकल्पना आहे. ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या या परिषदेत वित्त क्षेत्रातील तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट, आर्थिक समावेशन आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा होणार आहे.

तीन रेल्वे अन् तीन महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन

गुजरात दौऱ्यादरम्यान वडोदरा येथे ९,७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ३२९ किलोमीटर लांबीच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा-रतलाम तिसरी व चौथी रेल्वे लाईन, मियागम कर्जन-चोरंडा-मालसर गेज रूपांतरण आणि विश्वामित्री-दाभोई दुहेरीकरणाचा समावेश आहे. तसेच सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:26 08-09-2026