Ratnagiri Ganeshotsav Musical Instruments Demand: रत्नागिरीत गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या; ढोल-ताशे, ढोलकी खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी

उत्तर प्रदेशातील कारागीर रत्नागिरीत दाखल; वाढत्या दरांमुळे मंडळांच्या बजेटवर अतिरिक्त भार

रत्नागिरी : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठांमध्ये तयार गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य आणि पारंपरिक वाद्यांची दुकाने सजली असून घराघरांत उत्सवाच्या तयारीला मोठा वेग आला आहे. ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी आणि आरती-भजनासाठी सध्या ढोल, ताशे आणि ढोलकी या पारंपरिक वाद्यांना तुफान मागणी दिसून येत आहे.

Ratnagiri Ganeshotsav Musical Instruments Demand: परराज्यातून ढोलकी कारागीर दाखल

गणेशोत्सवात मिरवणुका, आरत्या, भजन-कीर्तन यामध्ये वाद्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. हीच मागणी लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातून ढोलकी तयार करणारे अनेक कारागीर दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरीत दाखल झाले आहेत. लहान तसेच मोठ्या आकाराच्या ढोलकी खरेदीसाठी त्यांच्या दुकानांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिक बाजारपेठांमध्येही ढोलकी आणि तबल्यांचा ठेका घुमू लागला असून, वाद्यांच्या तालाची चाचपणी करताना उमटणाऱ्या थामांमुळे बाजारपेठेतील गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोकणाच्या मातीत रूजलेल्या श्रद्धेचा आणि परंपरेचा हा नाद गावोगावी घुमण्यास सज्ज झाला आहे.

वाद्यांचे दर वाढल्याने बजेटवर ताण

यंदा वाद्यांच्या दरांमध्ये झालेली वाढ गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांच्या चिंतेत भर घालत आहे. सध्या बाजारात लहान मुलांच्या ढोलकीची किंमत २५० रुपयांपासून सुरू होत असून, मोठ्या आकाराच्या ढोलकी ५०० ते १००० रुपयांपेक्षा जास्त दराने विकल्या जात आहेत. ढोल आणि ताशांच्या आकारमानानुसार, बनावटीचा दर्जा व कातडीच्या गुणवत्तेनुसार किमती निश्चित केल्या जात आहेत. चांगल्या दर्जाच्या वाद्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याने घरगुती गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बजेटवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 08-09-2026