Ratnagiri Hospital Fire Audit: रत्नागिरीतील जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांचे फायर ऑडिट लवकरच!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची माहिती; जिल्ह्यातील २६७ आरोग्य केंद्रांचेही दरवर्षी ऑडिट

रत्नागिरी : अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी व धर्मादाय रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह तीन उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले असून, उर्वरित रुग्णालयांचे ऑडिटही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली आहे.

Ratnagiri Hospital Fire Audit: दर सहा महिन्यांनी अग्निसुरक्षा यंत्रणेची चाचणी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत दापोली, कळंबणी व कामथे ही तीन उपजिल्हा रुग्णालये, तसेच मंडणगड, गुहागर, देवरूख, संगमेश्वर, लांजा व रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये नियमितपणे अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी केली जाते आणि दर सहा महिन्यांनी आवश्यक ती चाचणीही घेतली जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण झाले असून सर्व रुग्णालये सुरक्षित असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.

२६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे दरवर्षी ऑडिट

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २६७ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी फायर ऑडिट केले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. आरोग्य केंद्रांतील विद्युत यंत्रणा, ऑक्सिजन सिलिंडर, जनरेटर, औषध साठवण कक्ष आणि इतर ज्वलनशील साहित्याची बारकाईने तपासणी केली जाते.

शॉर्टसर्किट टाळण्यासाठी दरवर्षी इलेक्ट्रिक ऑडिट

शॉर्टसर्किट किंवा विद्युत बिघाडामुळे आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी रुग्णालयांचे दरवर्षी इलेक्ट्रिक ऑडिटही केले जाते. यंदाही तज्ज्ञ इलेक्ट्रिशियनमार्फत जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमधील विद्युत यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 08-09-2026