रस्त्याच्या मध्यभागी स्वेफ्ट डिझायर उभी करून चालक पसार
खेड : खेड तालुक्यातील अत्यंत गजबजलेल्या भरणे नाका येथील उड्डाणपुलाखाली (ब्रिजखाली) रस्त्याच्या मध्यभागी आपली कार उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका ५२ वर्षीय कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Bharne Naka Bridge Traffic Obstruction: रस्त्याच्या मध्यभागी कार सोडून चालक गायब
ही घटना रविवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री ८:०५ वाजेच्या सुमारास भरणे नाका ब्रिजखाली घडली. संशयित कारचालक शैलेंद्र कैलासनाथ तिवारी (वय ५२, रा. संजय पार्क, नवघर रोड, साईनगर, भाईंदर पूर्व, ठाणे) यांनी आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 04 MH 9089) रस्त्याच्या अगदी मध्यभागी उभी केली होती.
रस्त्याच्या मध्यभागी निष्काळजीपणे उभ्या असलेल्या या वाहनामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवाला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, वाहन रस्त्यात उभे करून चालक तेथून निघून गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात व नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
खेड पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस शिपाई कल्याणी ज्ञानेश्वर आरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११:०५ वाजता या बेजबाबदार कारचालकाविरुद्ध अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 08-09-2026














