फगरवठार पोलीस लाईन जवळ चिमुकल्यावरील हल्ल्याने संताप; मोकाट कुत्रे आणि गुरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस प्रचंड वाढला असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाईन जवळ नुकताच एका लहान मुलावर कुत्र्यांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची भयानक घटना घडली. या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करा, अन्यथा रत्नागिरी नगर परिषदेवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करू, असा आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे.
Ratnagiri Stray Dog Threat Prasad Sawant: मारुती मंदिर, माळनाका परिसरात कुत्र्यांच्या टोळ्या
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, एसटी स्टँड परिसर, माळनाका आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांवर दररोज हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिक या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
नगर परिषद केवळ कर वसुली करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप सावंत यांनी केला. फगरवठार पोलीस लाईन जवळ दोन दिवसांपूर्वी खेळणाऱ्या एका लहान मुलावर ७ ते ८ कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला चढवून त्याला फरफटत झाडीत नेले होते. तेथील पालक आणि जागरूक नागरिकांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्या बालकाचा जीव वाचला. अन्यथा घडलेल्या या दुर्घटनेची जबाबदारी कोणी घेतली असती, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘निर्बीजीकरण कधी झाले जाहीर करा’
प्रसाद सावंत पुढे म्हणाले, “नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण यापूर्वी किती वर्षांपूर्वी केले होते ते आधी जाहीर करावे, म्हणजे प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरतील. येत्या काही दिवसांत नगर परिषदेने ठोस कारवाई केली नाही आणि एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी आणि प्रशासनाची राहील. आम्ही थेट पोलीस ठाण्यात नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू.”
भटक्या कुत्र्यांबरोबरच शहरातील मोकाट गुरे हीसुद्धा मोठी डोकेदुखी ठरत असून त्यांचाही बंदोबस्त करून नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. नागरिक रीतसर टॅक्स भरतात, त्यामुळे त्यांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणीही त्यांनी शेवटी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 08-09-2026














