Sansad Ratna Award 2026 : महाराष्ट्रातील पाच खासदारांचा नवी दिल्लीत सन्मान! संसद रत्न पुरस्काराने सन्मानित

Sansad Ratna Award 2026 सोहळ्यात महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील भीम हॉलमध्ये आयोजित १६ व्या संसद रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

भाजपच्या खासदार स्मिता वाघ, खासदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. हेमंत सावरा यांनाही संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Sansad Ratna Award 2026 : खासदार नरेश म्हस्के व डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

संसदेतील उत्तम उपस्थिती, विविध विषयांवर आणि अर्थसंकल्पावर मांडलेली अभ्यासपूर्ण मते तसेच विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे खासदारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “पदार्पणापासूनच सलग दुसऱ्या वर्षी हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे.”

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही हा सन्मान मतदारसंघातील जनतेला समर्पित केला आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन्ही खासदारांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 10-09-2026