रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत २८०० मेगावॅटचा प्रकल्प उभारणार; ११ हजार ७०० रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होणार
Maharashtra Nuclear Power Projects मुळे महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात एक क्रांती घडणार आहे. राज्याची वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन अणुऊर्जा प्रकल्पांची उभारणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपन्यांसोबत ४२०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) केले आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात तब्बल ७९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून ११ हजार ७०० रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारने ‘शांती’ कायद्याला मान्यता दिल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. या पार्श्वभूमीवर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या दीर्घ अनुभवानंतर महाराष्ट्राने या क्षेत्रात पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. सौर आणि पवन ऊर्जेसोबतच राज्याला अखंडित आणि स्वच्छ वीजपुरवठा (Base Load) मिळण्यासाठी अणुऊर्जा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Nuclear Power Projects Investments : जेएसडब्ल्यू आणि टोरेंट पॉवरचे प्रस्तावित प्रकल्प
या करारांतर्गत दोन्ही कंपन्या महाराष्ट्रात मोठे प्रकल्प उभारणार आहेत. त्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
- जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड (दापोली प्रकल्प): हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिवबुंदर (आगरी गाव) येथे उभारला जाणार आहे. याची एकूण क्षमता २८०० मेगावॅट (४ x ७०० मेगावॅट) असणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जाणार असून, यासाठी सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून सुमारे ८ हजार ते १० हजार रोजगार निर्माण होतील.
- टोरेंट पॉवर लिमिटेड: टोरेंट पॉवरचा १४०० मेगावॅट (२ x ७०० मेगावॅट) क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात किंवा राज्यातील अन्य योग्य ठिकाणी प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून १७०० लोकांना रोजगार मिळेल.
या कराराच्या वेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे–बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महापारेषणचे अध्यक्ष विक्रम कुमार, महाजनकोचे अध्यक्ष राधाकृष्णन बी. यांच्यासह टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वदेशी तंत्रज्ञान आणि थोरियम आधारित अणुभट्ट्यांमुळे महाराष्ट्रात अणुऊर्जेचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 10-09-2026














