२, ६ आणि ११ गुणांच्या धक्कादायक तफावतीनंतर एमपीएससीचा निर्णय; केवळ गुणांची बेरीज करण्यापेक्षा प्रत्यक्ष पुनर्मूल्यांकनाची परीक्षार्थींची मागणी
MPSC Big Update News मुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराकडे वेधले गेले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालात उमेदवारांच्या गुणांमध्ये प्रचंड तफावत दिसून आल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत आयोगाने गुणांच्या फेरपडताळणीची (Verification of Marks) संधी उपलब्ध करून दिली आहे. या ऑनलाईन अर्जाची अंतिम मुदत १० सप्टेंबर २०२६ म्हणजेच आज संपत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. निकालानंतर मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांच्या गुणांमध्ये धक्कादायक तफावत समोर आली होती. काही पेपर्समध्ये उमेदवारांना २५० पैकी अवघे २, ६, ११ आणि १४ असे अत्यंत नगण्य गुण देण्यात आले होते. एका उमेदवाराला भाषा, निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या (GS) सर्व पेपर्समध्ये १०० हून अधिक गुण मिळालेले असताना वैकल्पिक विषयाच्या एका पेपरमध्ये मात्र अवघे २ गुण देण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी तीव्र संशय व्यक्त करत पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या.
MPSC Controversy On Verification : ‘फेरतपासणी’ की केवळ ‘बेरीज’?
विद्यार्थ्यांच्या वाढत्या विरोधानंतर आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करत गुणपडताळणीचा निर्णय घेतला असला, तरी परीक्षार्थींमध्ये अद्याप समाधान झालेले नाही. आयोगाने दिलेल्या सूचनेत उत्तरपत्रिकांचे प्रत्यक्ष पुनर्मूल्यांकन (Revaluation) किंवा फेरतपासणी न करता केवळ ‘गुणांची फेरपडताळणी’ (Verification) असा उल्लेख केला आहे.
केवळ गुणांची बेरीज करून मूळ त्रुटी दूर होणार नाहीत, असे मत व्यक्त करत स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या तपासनिसांनी किंवा तज्ज्ञांनी अशा प्रकारे २ किंवा ६ गुण दिले आहेत, त्या सर्व उत्तरपत्रिकांची पारदर्शकपणे प्रत्यक्ष फेरतपासणी व्हावी, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
MPSC Important Dates & Process : अर्जाचा तपशील
- अंतिम मुदत: १० सप्टेंबर २०२६
- अर्ज पद्धत: उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (mpsc.gov.in) आपल्या लॉगीन प्रोफाइलद्वारे विहित शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
- निकाल तपशील: गुणपडताळणीनंतरची सुधारित किंवा अंतिम परिस्थिती थेट उमेदवाराच्या प्रोफाइल डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 10-09-2026














