BRICS Summit 2026: नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन; पुतिन भारतात दाखल, जिनपिंग १२ सप्टेंबरला येणार

भारत मंडपम येथे जय्यत तयारी; मोदी, पुतिन, जिनपिंग आणि पेजेश्कियन एकत्र येण्याची शक्यता

नवी दिल्ली :

१८ वी ब्रिक्स शिखर परिषद (BRICS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर रोजी भारताची राजधानी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित करण्यात आली आहे. जागतिक राजकारणातील बदलते सत्तासमीकरण, अमेरिका-चीन व्यापार व सामरिक तणाव, युक्रेन युद्ध आणि ‘ग्लोबल साऊथ’च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक महासत्तांचे नेते भारतात येत असल्याने राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तब्बल सात वर्षांनंतर १२ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होणार असून शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. याशिवाय इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन हेदेखील या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रशिया, चीन, भारत आणि इराण हे चारही देश या व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत.

संरक्षण व ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावर भारत-रशिया चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी बिश्केक येथील SCO शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. दिल्लीतील चर्चेत रशियाकडून मिळणाऱ्या S-400 प्रणालींच्या उर्वरित पुरवठ्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या संभाव्य अपग्रेडवर आणि Su-57 लढाऊ विमानासंदर्भातील प्रस्तावांवर विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतातील नवीन नागरी अणुभट्ट्या आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य यावरही चर्चा होईल. पुतिन हे ब्रिक्स बिझनेस फोरमच्या पूर्ण अधिवेशनाला संबोधित करणार असून इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा करतील.

पश्चिम आशियातील तणाव आणि इराणसोबत धोरणात्मक चर्चा

ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासोबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणचा ब्रिक्स संघटनेत समावेश झाल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित मुद्दे या बैठकीत महत्त्वपूर्ण ठरतील. दुसरीकडे, शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे भारत-चीन राजनैतिक संबंधांना चालना मिळण्याची अपेक्षा असली, तरी व्यावसायिक व आर्थिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अजून सकारात्मक चिन्हे दिसत नाहीत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 11-09-2026