मराठवाडा ते कोकण थेट रेल्वे सेवा; २४ डब्यांची गाडी, प्रवाशांना मोठा दिलासा
खेडे :
Nanded Sawantwadi Train: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून थेट कोकणाशी रेल्वेने जोडणाऱ्या या विशेष गाडीचा खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीसह कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
नांदेड-पुणे-कल्याण-रत्नागिरी-सावंतवाडी रोड या मार्गावर ही विशेष गाडी धावणार आहे. नांदेड-सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. ही गाडी १२ आणि १५ सप्टेंबर रोजी नांदेड येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड-नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या असतील. ही गाडी १४ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
Nanded Sawantwadi Train चे महत्त्वाचे थांबे
या विशेष गाडीला पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई किंवा पुण्यामार्गे स्वतंत्र प्रवास करण्याची गरज कमी होणार असून थेट कोकणात पोहोचण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
२४ डब्यांची विशेष गाडी
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वेला तब्बल २४ डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये दोन-टियर वातानुकूलित श्रेणीचे ३, तीन-टियर वातानुकूलित श्रेणीचे ५, शयनयानाचे १०, सामान्य द्वितीय श्रेणीचे ४ आणि एसएलआरचे २ डबे असतील. या गाडीसाठी विशेष तिकीट दर आकारण्यात येणार असून मराठवाड्यातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही ट्रेन अत्यंत सोयीची ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 11-09-2026














