२१३ दुकानांची तपासणी करून ११९ नमुने प्रयोगशाळेत; २ लाख ४० हजार रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या भेसळखोर व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उचलला आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खवा/मावा, डेअरी उत्पादने आणि किराणा मालाला प्रचंड मागणी असते. याचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या घटकांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, डेअरी आणि किराणा दुकाने अशा तब्बल २१३ आस्थापनांची कसून तपासणी केली असून ११९ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
दोषी आढळलेल्या ४ आस्थापनांना कामबंदीची नोटीस
अन्न व औषध प्रशासन निरीक्षक तृप्ती घरत यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान ४ व्यावसायिक गंभीररीत्या दोषी आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या या चारही आस्थापनांना अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कामबंदीची नोटीस बजावली असून, सर्व कायदेशीर निकष पूर्ण करेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश दिले आहेत.
६९ हजारांचा दंड वसूल; २ लाख ४० हजारांचा माल जप्त
अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांकडून तडजोड व दंडाच्या स्वरूपात ६९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय सुमारे ४२५ किलो वजनाचा आणि २ लाख ४० हजार रुपये बाजारमूल्य असलेला संशयास्पद व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सकस व सुरक्षित अन्न मिळावे यासाठी ही धडक मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













