गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश; अतिक्रमण आणि मोकाट जनावरांच्या समस्येवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश
मुंबई आणि पुण्याहून रेल्वेने रत्नागिरी स्थानकात दाखल होणाऱ्या जिल्हावासीयांकडून काही रिक्षाचालक भरमसाट भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. अशा जास्त भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) कडक नियंत्रण ठेवावे आणि त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
शांतता समितीच्या बैठकीत निर्णयांचा धडाका
आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आकांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.
रस्ते अतिक्रमण आणि वाहतूक नियोजनावर भर
बैठकीत शहरातील नागरिक व चाकरमान्यांच्या प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी खालील महत्त्वाचे निर्देश देण्यात आले:
- रामनाका ते विठ्ठल मंदिर रस्ता अतिक्रमणमुक्त करणे: रस्त्यावर फळविक्रेत्यांच्या गाड्या आणि दुचाकींच्या बेवारस पार्किंगमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीने रस्ते मोकळे करावेत.
- मोकाट जनावरांचा बंदोबस्त: रस्त्यांवरील मोकाट गुरांचा त्रास रोखण्यासाठी पकडलेल्या जनावरांच्या संवर्धनाचे योग्य नियोजन करावे आणि शहरांतील फुटपाथ मोकळे करावेत.
- वाहतूक फलक व अवजड वाहने: जड व अवजड वाहनांच्या वाहतूक परवानगीबाबत नियमावली पाळावी आणि ‘नो पार्किंग’सह महत्त्वाचे मार्गदर्शक फलक नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावावेत.
विसर्जन स्थळांवर विशेष सुरक्षा व्यवस्था
गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बोटींची सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
शांतता समिती सदस्यांसाठी विशेष व्हॉट्सॲप ग्रुप
शांतता समितीच्या सदस्यांशी अधिक चांगला समन्वय राहावा यासाठी त्यांना अधिकृत ओळखपत्रे दिली जाणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत माहितीची जलद देवाणघेवाण व्हावी यासाठी सदस्यांचा एक विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 12-09-2026















