Aniket Wadkar Indian Army: अनिकेत वाडकर याची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड!

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यश; १४ व्या प्रयत्नात पूर्ण केले भारतीय लष्करातील अधिकारी पदाचे स्वप्न

रत्नागिरी : अनिकेत निलेश वाडकर याने सलग १३ वेळा आलेल्या अपयशाने खचून न जाता, अत्यंत चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने चौदाव्या प्रयत्नात भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंटपद मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीशी घट्ट नाते असलेल्या अनिकेतची भारतीय लष्कराच्या ‘कॉर्प्स ऑफ इंजिनिअर’ (Corps of Engineers) या युनिटमध्ये अधिकारी म्हणून अधिकृत नियुक्ती झाली आहे.

अथक परिश्रमांचा आणि जिद्दीचा प्रवास

मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेले व कोकण रेल्वेमध्ये नोकरीनिमित्त सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचा सुपुत्र अनिकेत याने आपल्या यशाने तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये ‘ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी’ (OTA) गया येथे त्याच्या प्रशिक्षणाचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर ५ सप्टेंबर २०२६ रोजी एनडीएच्या पासिंग आऊट परेड दिवशी अनिकेतने भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करून आपले बालपणीचे स्वप्न साकार केले.

संरक्षण दलाची लहानपणापासूनच आवड

अनिकेतला लहानपणापासूनच भारतीय संरक्षण दलाविषयी विशेष आकर्षण होते. सैनिकी गणवेश, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा त्याला सतत आकर्षित करत असे. शालेय जीवनात त्याने एनसीसीमध्ये (NCC) सहभाग घेतला होता, ज्यामुळे त्याला लष्करी वातावरणाचा जवळून अनुभव आणि परिचय मिळाला.

अनिकेतच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 12-09-2026