गणेशोत्सवात जादा भाडे उकळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे RTO ला निर्देश

गणेशोत्सवात जादा भाडे उकळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे RTO ला निर्देश

जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न; मोकाट गुरे, अतिक्रमण, अखंडित वीजपुरवठा व विसर्जन व्यवस्थापनाबाबत दिले कडक आदेश

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यावरून रेल्वेने रत्नागिरीत दाखल होणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे स्थानकावरून शहरात किंवा ग्रामीण भागात सोडण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून मनमानी व भरमसाठ भाडे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) यावर तातडीने कडक नियंत्रण ठेवावे आणि प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या रिक्षाचालकांवर थेट कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी दिले आहेत. आगामी १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रशासकीय व पोलीस यंत्रणेची उपस्थिती

या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आकांक्षा यादव, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे आदी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभाग नोंदवला. याशिवाय विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोकाट गुरे, फुटपाथ आणि वाहतूक व्यवस्थापन

उत्सवादरम्यान शहरात रस्त्यांवर मोकाट गुरांचा उपद्रव होऊ नये यासाठी पालिकेने योग्य ती दक्षता घ्यावी, शहरातील पादचाऱ्यांचे फुटपाथ तातडीने मोकळे करावेत आणि पकडण्यात आलेल्या जनावरांच्या गोशाळेतील संवर्धनाबाबत ठोस नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच गर्दीच्या काळात जड व अवजड वाहनांच्या वाहतूक परवानगीबाबत नियमावली पाळावी आणि ‘नो पार्किंग’ तसेच दिशादर्शक फलक नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले.

रामनाका ते विठ्ठल मंदिर मार्गावरील अतिक्रमण हटवा

रामनाका ते विठ्ठल मंदिर या वर्दळीच्या रस्त्यावर फळविक्रेत्यांनी रस्त्यावरच हातगाड्या लावून केलेले अतिक्रमण आणि दुचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्यांना तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने मोहीम राबवून हा रस्ता वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी मोकळा करावा, असे आदेश यावेळी देण्यात आले.

विसर्जन स्थळांवर प्रकाशयोजना, सुरक्षा रक्षक व बोटींची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत महावितरणने कुठेही वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी हायमास्ट व जनरेटरची प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी लाईफ जॅकेटसह बोटींची सज्जता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आधीच निश्चित करून ते खड्डेमुक्त व अडथळाविरहित ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या.

शांतता समिती सदस्यांना ओळखपत्रे व विशेष व्हॉट्सॲप ग्रुप

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांशी प्रशासनाचा उत्तम समन्वय राहावा, यासाठी सर्व सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे (ID Cards) वितरित केली जाणार आहेत. याशिवाय आपत्कालीन प्रसंगी तातडीने माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सदस्यांचा एक विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.