कोकणातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी मोहीम; चालकांची होणार मद्य व अंमली पदार्थ तपासणी

कोकणातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी मोहीम; चालकांची होणार मद्य व अंमली पदार्थ तपासणी

‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास’ अंतर्गत २०२६ ते २०२९ दरम्यान धडक मोहीम; परिवहनमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : कोकणात ये-जा करणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक शिस्तबद्ध व अपघातमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य व अंमली पदार्थ तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहनमंत्र्यांनी या व्यापक मोहिमेची अधिकृत घोषणा केली असून, २०२६ ते २०२९ या सलग तीन वर्षांच्या कालावधीत ही तपासणी मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे.

कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांवर प्रवाशांना मिळणार सुरक्षा

रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम, घाटमाथा आणि तीव्र वळणावळणाच्या महामार्गांवरून दररोज हजारो वाहने धावत असतात. गणेशोत्सव, होळी यांसारख्या सणांच्या काळात चाकरमान्यांची मोठी गर्दी कोकणच्या मार्गांवर असते. अशा संवेदनशील आणि आव्हानात्मक मार्गांवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी ही तपासणी यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस व मालवाहू चालकांची होणार कसून तपासणी

या विशेष तपासणी मोहिमेत केवळ एसटी महामंडळाचे चालकच नव्हे, तर खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, टॅक्सी, ऑटोरिक्षा तसेच मालवाहतूक करणारे अवजड ट्रक आणि टँकरचालकांचीही नियमित तपासणी केली जाईल. या पारदर्शक आणि कडक प्रणालीमुळे अमली पदार्थ किंवा नशेच्या प्रभावाखाली बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या चालकांना वेसण बसेल आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.