गणेशोत्सव काळात अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

गणेशोत्सव काळात अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

आंबा घाटातील बंदीमुळे अणुस्कुरा घाटावर ताण; रस्ते खड्ड्यात आणि वाहतूक कोंडीचा धोका

गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध शहरांतून कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा, यासाठी राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील जनतेने अणुस्कुरा घाटातील अवजड वाहतूक पुढील काही दिवस तात्पुरती बंद ठेवावी, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे.

आंबा घाटातील बंदीमुळे अणुस्कुरा मार्गावर ताण

काही दिवसांपूर्वी कोकणातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रमुख आंबा घाटात रस्त्याला तडे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी, या मार्गावरील बहुतांश अवजड वाहतूक ओणी-अणुस्कुरा मार्गे वळवण्यात आली आहे. गेल्या महिन्याहून अधिक काळ या मार्गावरून प्रचंड प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने ओणीपासून ते थेट अणुस्कुरा घाटापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा प्रवास अधिक धोकादायक आणि त्रासदायक बनला आहे.

घाटात गाड्या बंद पडल्यास वाहतूक पूर्ण ठप्प होण्याचा धोका

अणुस्कुरा घाट अत्यंत अरुंद आणि नागमोडी वळणांचा आहे. या घाटात दोन वाहने समोरासमोर आल्यास ती एकमेकांना क्रॉस होणेही कठीण जाते. अशा स्थितीत एका बाजूला उंच डोंगर-दरड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने एखादे अवजड वाहन बंद पडल्यास ते बाजूला घेणे किंवा पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणे अशक्य होते. गेल्या काही दिवसांत घाटात अवजड वाहने बंद पडून तासन् तास वाहतूक ठप्प झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

अवजड वाहनांची मोठी वर्दळ

सध्या अणुस्कुरा मार्गावरून जळाऊ लाकूड वाहतूक करणारे ट्रक, पेट्रोल-डिझेल टँकर, एलपीजी गॅस सिलिंडरची वाहने आणि इतर अवजड मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची हजारो वाहने कोकणात दाखल होत आहेत. अशा वेळी जर घाटात एखादे वाहन बंद पडले, तर हजारो प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.

प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा

गणेशोत्सव कालावधीत किमान काही दिवस या मार्नावरील अवजड वाहतूक पूर्णपणे रोखून चाकरमान्यांच्या आणि हलक्या वाहनांच्या प्रवासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडीचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच अणुस्कुरा घाटाबाबत योग्य तो अधिकृत आदेश काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.