युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सतर्फे रत्नागिरीत निदर्शने; मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय संपाचा इशारा
पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू करावे, केंद्र सरकारच्या एकतर्फी व भेदभावपूर्ण पीएलआय (PLI) योजनेची अंमलबजावणी स्थगित करून ती मागे घ्यावी आणि बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या प्रमुख मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या देशव्यापी संपाला ११ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या कोकणात गणेशोत्सवाची लगबग सुरू असल्याने बँकेच्या संपामुळे नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांना आर्थिक व्यवहारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर भव्य रॅली
११ सप्टेंबर रोजी सकाळी मारुती मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही रॅली बँक ऑफ इंडिया जोनल ऑफिसमार्गे भारतीय स्टेट बँक रिजनल ऑफिस, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे पोहोचली. तेथे विविध बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला आणि सुमारे तीन तास निदर्शने केली.
महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या निदर्शनांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध बँकांमधील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने झालेला उत्स्फूर्त सहभाग होता. ४ आणि ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चर्चेमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने हा संप पुकारण्यात आला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी तीन दिवसीय संपासाठी अधिक जोमाने तयारी करण्याचा निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात विविध बँक संघटनांचे पदाधिकारी आणि २०० ते २५० च्या संख्येने कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.













