Ratnagiri Ganeshotsav 2026: रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३ हजार ४६ गणरायांना भावपूर्ण निरोप

Ratnagiri Ganeshotsav 2026: रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३ हजार ४६ गणरायांना भावपूर्ण निरोप

गणपती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह; ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमला

रत्नागिरी गणपती विसर्जन सोहळा मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्याभरात अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भाविकांच्या डोळ्यांतील अश्रू अशा भावुक वातावरणात जिल्ह्यातील दीड दिवसाच्या १३ हजार ४६ गणरायांना मंगळवारी निरोप देण्यात आला. यामध्ये १३ हजार ४० घरगुती गणपती आणि ६ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता.

सोमवारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात मोठ्या उत्साहात विराजमान झालेल्या गणरायांचे मंगळवारी दीड दिवसाने विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जन मिरवणुकांना वेग आला. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील विविध विसर्जन घाट आणि समुद्रकिनारे दिवसभर गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. सहकुटुंब विसर्जनासाठी आलेल्या भाविकांमुळे ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

किनाऱ्यांवर ढोल-ताशांचा गजर अन् गुलाल

रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी, मिर्या किनारपट्टीसह ग्रामीण भागातील नद्या व विसर्जन घाटांवर ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जनापूर्वी महिलांनी पारंपारिक पद्धतीने गणरायाची आरती केली आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पाला निरोप दिला. विसर्जन करताना अनेक भाविक भावुक झाले. दीड दिवसाचा सहवास संपल्याने विशेषतः बालकंपनी काहीशी हिरमुसली होती.

प्रशासनाची चोख व्यवस्था आणि पर्यावरणपूरक विसर्जन

विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने विविध ठिकाणी विशेष व्यवस्था केली होती. पोलिसांनी समुद्रकिनारे आणि विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त ठेवला होता. जीवरक्षक तसेच पालिकेचे अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात आले होते.

दरम्यान, अनेक सुजाण नागरिकांनी शाडूच्या पर्यावरणापूरक गणेशमूर्तींना प्राधान्य देत घरच्या घरी टब किंवा बादलीत विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. रत्नागिरीसह खेड, चिपळूण (गांधारेश्वर घाट), दापोली, लांजा, मंडणगड, संगमेश्वर, देवरूख, गुहागर आणि राजापूर या सर्व तालुक्यांतही दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.