मुंबई-गोवा महामार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; वेळवंड येथील २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; वेळवंड येथील २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बावनदी पुलाजवळील धोकादायक वळणावर शेवरलेट एन्जॉय कारची दुचाकीला जोरदार धडक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे भरधाव शेवरलेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस विनायक पांचाळ (वय २४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि भरधाव वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस हा बावनदी येथील पुलावरून वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने अत्यंत वेगाने जाणाऱ्या शेवरलेट एन्जॉय कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, तेजस दुचाकीवरून लांब उडून रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडला होता.

उपचारापूर्वीच मृत्यू; वेळवंड गावावर शोककळा

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीने जखमी तेजसला तातडीने पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच वेळवंड गावावर आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील धोकादायक वळणे, दिशादर्शक चिन्हांचा अभाव आणि चालकांचे वेगावरील नियंत्रण सुटणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.