मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथील धक्कादायक घटना; याच वर्षी इंजिनिअर झालेल्या तरुणाच्या निधनाने गावावर शोककळा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या २२ वर्षीय युवकाचा खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मेढे-मांजरेजवळील जांभळी बंदर येथे घडली आहे. अथर्व राजेश देसाई (वय २२, रा. मूळ मेढे-मांजरे कळकदेकोंड, सध्या मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोहता येत नसतानाही खाडीच्या पाण्यात उतरल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तो बुडाला. एनडीआरएफच्या (NDRF) पथकाने तब्बल २३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी सायंकाळी अथर्वचा मृतदेह शोधून काढला.
अथर्व आपल्या पालकांसह गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आला होता. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो घरातील कोणालाही कल्पना न देता निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई आणि वेदांत मनीष देसाई या मित्रांसह जांभळी बंदर येथे पोहण्यासाठी गेला होता.
ओहोटीचा प्रवाह अन् मित्रांची धावपळ
जांभळी बंदर येथे पोहोचले तेव्हा ओहोटी सुरू असल्याने खाडीच्या पाण्याला जोरदार प्रवाह होता. अथर्वला पोहता येत नव्हते, तसेच त्याचे मित्रही पोहण्यात फारसे तरबेज नव्हते. तरीही अथर्वने पाण्यात उडी मारली आणि काही वेळातच तो पाण्याच्या प्रवाहात बुडू लागला. त्याला बुडताना पाहून घाबरलेल्या मित्रांनी तातडीने वाडीत धाव घेत ग्रामस्थांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पालक, नातेवाईक व ग्रामस्थांनी खाडीत उतरून शोध सुरू केला; मात्र पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोधकार्यात मोठे अडथळे येत होते.
पोलिसांची रात्रभर मोहीम अन् NDRF कडून मृतदेह हस्तगत
घटनेची माहिती मिळताच डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे पथक, संगमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने होड्यांच्या सहाय्याने रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र यश न आल्याने रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. एनडीआरएफच्या दोन पथकांनी मंगळवारी दुपारनंतर शोधमोहीम तीव्र केली आणि अखेर सायंकाळी साडेचारच्या सुमारास अथर्वचा मृतदेह हाती लागला.
याच वर्षी झाला होता इंजिनिअर
अथर्वने याच वर्षी अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण केले होते. अभ्यासासोबतच तो खेळातही अत्यंत हुशार होता. नुकतेच शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या अथर्वच्या अचानक जाण्याने देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मेढे-मांजरे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.













