रत्नागिरी : कोकणनगर येथे मोकाट कुत्र्यांची दहशत; आठवड्यात तिघांवर हल्ला

रत्नागिरी : कोकणनगर येथे मोकाट कुत्र्यांची दहशत; आठवड्यात तिघांवर हल्ला

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तरुण गंभीर जखमी; पालिकेची नसबंदी मोहीम कागदावरच असल्याचा स्थानिकांचा आरोप

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. या हिंसक झालेल्या कुत्र्यांनी गेल्या अवघ्या आठवडाभरात दोन लहान मुलांसह एका तरुणावर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. नगरपालिकेचा आरोग्यविभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोकणनगर आणि परिसरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांचा, विशेषतः लहान मुले व वृद्धांचा हे कुत्रे अचानक पाठलाग करत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

पालिकेची नसबंदी मोहीम केवळ कागदावरच?

रत्नागिरी पालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीची मोहीम राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र, प्रत्यक्षात या मोहिमेचा कोणताही सकारात्मक परिणाम कोकणनगरात दिसून आलेला नाही. उलटपक्षी कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेची नसबंदी मोहीम केवळ कागदावरच राहिली आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उघड्यावरील मांसाच्या टाकाऊ भागांमुळे कुत्रे हिंसक

परिसरातील कुत्रे अचानक हिंसक होण्यामागे स्थानिक चिकन सेंटर चालक कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. दुकानांमधील उरलेले मांस आणि टाकाऊ भाग उघड्यावर फेकून दिले जात असल्याने ते खाण्यासाठी कुत्र्यांमध्ये झुंज लागते. यामुळेच हे कुत्रे अधिक आक्रमक आणि हिंसक बनत चालले आहेत, असा दावा स्थानिकांनी केला असून प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.