Ratnagiri Gauri Ganpati Visarjan: रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १४ हजारांहून अधिक मूर्तींना आज निरोप

Ratnagiri Gauri Ganpati Visarjan: रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १४ हजारांहून अधिक मूर्तींना आज निरोप

सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाचा किनारी कडक बंदोबस्त

रत्नागिरीत गौरी गणपती विसर्जन आज अत्यंत श्रद्धापूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडत आहे. १४ सप्टेंबर रोजी ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला दीड दिवसाच्या विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या मुक्कामानंतर निरोप दिला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ लाख १४ हजार ३५१ घरगुती आणि ८ सार्वजनिक गौरी-गणपतींचे विसर्जन आज विविध पाणवठ्यांवर आणि समुद्रकिनाऱ्यांवर होत आहे. पाच दिवस चाललेल्या पूजा-अर्चा, आरत्या आणि भजनांच्या धार्मिक कार्यक्रमानंतर ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाचा किनारी कडक बंदोबस्त

विनाअडथळा आणि शांततेत विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष आदेश लागू केले आहेत. वाहनांसोबत येणाऱ्या ठराविक गणेशभक्तांनाच थेट किनाऱ्यापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. ग्रामीण भागात पोलीस पाटलांना योग्य सूचना देऊन प्रशासनाने स्थानिक पातळीवर समन्वय साधला आहे, जेणेकरून कोणत्याही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

cake of the day

मांडवी आणि भाट्ये चौपाटीवर विशेष यंत्रणा

रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये किनाऱ्यावर सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मांडवी चौपाटीकडे जाणाऱ्या मुख्य चौकात पहिला बंदोबस्त, मांडवी नाक्यावर दुसरा टप्पा आणि थेट किनाऱ्यावर पोलिसांचे विशेष पथक तैनात असणार आहे. चार रस्त्यांच्या नाक्यापासून ते थेट वाळूपर्यंत पोलिसांची कडक नजर राहणार असून, यापूर्वी दीड दिवसाचे विसर्जन नागरिकांनी जसे शांततेत पार पाडले, तसेच आजचे विसर्जनही सुव्यवस्थित पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी पालिकेकडून निर्माल्य आणि मूर्ती संकलनाची सोय

पर्यावरणाचे रक्षण आणि किनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीने विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मांडवी चौपाटीवर भाविकांसाठी निर्माल्य संकलन कलश उभारण्यात आले आहेत. याशिवाय, ज्या भाविकांना किनाऱ्यावर गर्दीत जाणे शक्य नाही किंवा जे थेट मूर्ती संकलनास प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी पालिकेकडून गणेशमूर्ती संकलनासाठी स्वतंत्र गाडीची सोय करण्यात आली आहे.