मांडवी व भाट्ये चौपाटीसह शहरात विशेष सोयी; ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलाव, मोकाट जनावरांवर पालिकेचा कडक इशारा

Ratnagiri Gauri Ganpati Visarjan आज शनिवारी (१९ सप्टेंबर) रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात अत्यंत श्रद्धापूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडत आहे. १४ सप्टेंबर रोजी ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला दीड दिवसाच्या विसर्जनानंतर आता पाच दिवसांच्या मुक्कामानंतर निरोप दिला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ लाख १४ हजार ३५१ घरगुती आणि ८ सार्वजनिक गौरी-गणपतींचे विसर्जन आज विविध पाणवठ्यांवर व समुद्रकिनाऱ्यांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली आहे.
सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाचा किनारी कडक बंदोबस्त
विनाअडथळा आणि शांततेत विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष आदेश लागू केले आहेत. वाहनांसोबत येणाऱ्या ठराविक गणेशभक्तांनाच थेट किनाऱ्यापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. ग्रामीण भागात पोलीस पाटलांना योग्य सूचना देऊन प्रशासनाने स्थानिक पातळीवर समन्वय साधला आहे.

मांडवी आणि भाट्ये चौपाटीवर विशेष यंत्रणा
रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये किनाऱ्यावर विसर्जनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तीन टप्प्यांत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मांडवी चौपाटीकडे जाणाऱ्या मुख्य चौकात पहिला बंदोबस्त, मांडवी नाक्यावर दुसरा टप्पा आणि थेट किनाऱ्यावर पोलिसांचे विशेष पथक तैनात असणार आहे. चार रस्त्यांच्या नाक्यापासून ते थेट वाळूपर्यंत पोलिसांची कडक नजर राहणार आहे.
पर्यावरणपूरक विसर्जन: ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलाव
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत केली आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी ६ फूट व त्यापेक्षा कमी उंचीच्या सर्व पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे कलश उभारण्यात आले असून, मूर्ती संकलनासाठी पालिकेची विशेष गाडीही सज्ज करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांबाबत पालिका प्रशासनाचा कडक इशारा
उत्सवाच्या काळात वर्दळ वाढल्याने शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी आपली जनावरे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडू नयेत, असा सज्जड दम व इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गर्दी टाळावी, स्वच्छता राखावी व वाहतुकीस अडथळा आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.













